वृक्षप्रसादातून पर्यावरण संवर्धन करूया : सयाजी शिंदे

कोल्हापूर, ता. २९ : पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली असून, प्रत्येक देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना देशी झाडे प्रसादाच्या माध्यमातून देणे महत्त्वाचे ठरेल. ही संकल्पना प्रभावी राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत सह्याद्री देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. या वेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सह्याद्री देवराईच्या वतीने करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी दिमाखात वृक्षप्रसाद योजनेस प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अंबाबाई देवीचे फळ म्हाळंग तसेच आंबा, बेल, ताम्हीण, आपटा यांसह इतर देशी झांडांचे वितरण अभिषेक करणाऱ्या भाविकांना देण्यात येणार आहे.

सयाजी शिंदे म्हणाले, “नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून भाविकांना वृक्षप्रसाद मिळणार आहे. हा उपक्रम नित्य सुरू राहणार आहे. हे झाड जे वाढवतील, त्यांना नक्कीच आशीर्वाद मिळेल. हा उपक्रम सर्वांनी स्वीकारून झाडे वाढवावीत. त्याचा निश्चितच पर्यावरणास मोठा हातभार लागणार आहे.” या वेळी उत्तम जाधव, प्रशांत साळुंखे, मोहन खोत, चंद्रकांत लोहार, देवीचंद ओसवाल, महेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*