बीड : वड आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याची महानता अबाधित ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्या तोडीस बंदी घालावी. वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल करू नये, देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले.
बीडजवळ पालवन परिसरात गुरुवारपासून सुरु झालेल्या वृक्षसंमेलनाच्या समारोपावेळी सह्याद्री देवराई संस्थेचे धनंजय शेंडबाळे यांनी या ठरावांचे वाचन केले. व्यासपीठावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पाच झाडे लावणार का?
सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमीशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांचा सहभाग
पालवन परिसरात झालेल्या वृक्ष संमेलनास बीड जिल्हा व परिसरातील विद्यार्थीनी सहली काढून भेटी दिल्या. काही विद्यार्थी तर १४ कि.मी. अंतर पायी चालत आले होते. या वृक्षसंमेलनात विद्यार्थीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या सहभागाचे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही कौतुक केले.
कुतुहल जागविणारे प्रश्न
तासभर चाललेल्या वृक्षसुंदरी स्पर्धेत निसर्गाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे प्रश्न कुतुहल जागविणारे ठरले. या स्पर्धेसाठीच्या पॅनलमध्ये सयाजी शिंदे, अरविंद जगताप, श्रीकांत इंगनहळीकर, शिवानंद टाकसाळे, स्वींद्र बनसोड, कल्पना जगताप, आलका शिंदे, मेघना बडजाते आदींचा समावेश होता.



