सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई अभियानांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील पहिली देवराई मोहाडी येथे साकारण्याचे काम गावकऱ्यांनी हाती घेतले आहे.
ग्रामपंचायतीच्या स्वमालकीच्या पाच एकर ओसाड माळरानावर देवराई साकारण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गावातील सर्वच गटा तटातील लोक, ज्येष्ठ नागरिक, तरुण यांनी एकत्र येऊन गावाच्या माळरानावर देवराई उभारण्याचा निर्धार केला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री देवराई संस्थेच्या टीमने जागेची पाहणी करुन सदरच्या जागेवर देवराई उभारण्यासाठी होकार कळवला. तसेच प्रस्तावित जागेवर शिंदे यांच्या हस्ते पंचवटी वृक्षांच्या लागवडीचा श्रीगणेशा करण्यात आला. मोहाडी येथे उभारण्यात येणाऱ्या देवराईचे सर्वानुमते सह्याद्री देवराई गोपाळकृष्ण- मोहाडी असे नामकरण करण्यात आले.
प्रस्तावित जागेवर दहा फूट बाय दहा फूट इतक्या अंतराने झाडे लागवड करण्यासाठी २५०० खड्डे खोदण्यात आले. जागेच्या लगतच गावाचे मोठे सार्वजनिक तळे आहे. या तळ्यातून झाडांसाठी स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. सह्याद्री देवराई आणि वनविभाग यांच्याकडून सलई, असाना, गणेर, पायर, पारस वड, कहांडळ, तिवस, मोह, मेडशिंग, शिरीष, काटे सावर, काटे पांगारा, बिजा, कवट, शमी, शिवण, पापडा, जंगली अजाण, बेल, मोई, पळस इ. सर्व देशी प्रजातीच्या झाडांची रोपे उपलब्ध करण्यात आली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी, मोहाडी हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, तरुणवर्ग, महिला व बाळगोपाळांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. या सर्वांनी मिळून खोदलेल्या खड्ड्यांमध्ये लावण्यासाठी श्रमदान केले. झाडे देवराईत ५० आपट्याच्या रोपांची लागवड देखील करण्यात आली आहे. वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या ह्या सामाजिक चळवळीला लागणाऱ्या खर्चासाठी ग्रामस्थांकडून स्वेच्छेने निधी संकलित केला जात आहे.

