सयाजी शिंदे : पहिल्या वृक्ष संमेलनाचे बीडमध्ये उद्घाटन
बीड : मानवी आयुष्य वृक्षकेंद्रित आहे. झाडे असतील तर पाऊस पडेल, पर्यावरणाचे रक्षण होईल. ‘एक देश मागे गेला तर शेतकरी मागे गेला, एक देश पुढे गेला तर शेतकरी पुढे गेला.’ त्यामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी वृक्षलागवड करून संवर्धन आणि जतन करण्याचे आवाहन पहिल्या वृक्ष संमेलनात सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी केले. सिनेअभिनेता सयाजी शिंदे व सिनेलेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून पहिल्या वृक्ष संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी उत्साहात पार पडले. लिंबाच्या नावानं चांगभलं, पिंपळाच्या नावानं चांगभलं…
शेकडो पर्यावरणप्रेमींची मांदियाळी बुधवारी वृक्षदिंडीने बीड येथील वृक्ष संमेलनाला प्रारंभ झाला. गुरुवारी पालवण परिसरात पर्यावरणप्रेमींचा मेळा जमला. सातारा, चिपळूण, पुणे, लातूर, उस्मानाबाद आदी महाराष्ट्राच्या विविध भागांतून दीड हजारांहून जास्त पर्यावरणप्रेमी सायकल आणि इतर वाहनांनी आले होते. तसेच राज्यात २४ ठिकाणी असलेल्या देवराई सह्याद्री परिवाराचे तीनशेहून जास्त पर्यावरणस्नेही सहभागी झाले होते. वृक्ष सुंदरी स्पर्धेत १०० पेक्षा जास्त महाविद्यालयीन तरुणींचा सहभाग होता.

