सयाजी शिंदे : देवराई प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी वृक्षांची लागवड
नाशिक, ता. ५ : सातारा जिल्ह्यातील काटेश्वरच्या धर्तीवर नाशिकमध्येही दर श्रवणात महापालिकेतर्फे झाडांचा उत्सव होणार आहे. त्र्यंबकेश्वर व कपालेश्वराला श्रावणात भाविकांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर बेलांची झाडे लावण्याचा उत्सव साजरा होणार आहे. त्याअंतर्गत दर वर्षी शहराच्या विविध भागांत तीन हजार झाडे लावली जाणार असल्याची घोषणा देवराईचे जनक व अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली.
पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी (ता. ५) महापालिकेतर्फे वृक्षमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यात सातपूर विभागातील बेडकुळेनगर, पश्चिम विभागात गीतांजली सोसायटी, पंचवटी विभागात म्हसरूळ, सिडको विभागात हॉटेल साई प्लाझा व अमरधाम येथे सहा देवराईचे उद्घाटन अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महापालिका मुख्यालयात सामाजिक संस्था, अधिकाऱ्यांनी वृक्ष लावण्याची व जतन करण्याची शपथ घेतली.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते शिंदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की यापूर्वी पहिल्या टप्प्यात ३४ देवराई शहरात स्थापन करण्यात आल्या. त्यात ७६८ पैकी ७६४ वृक्षांना पालवी फुटली आहे. तर सहा व पुढील काळात अजून ३४ ठिकाणी देवराई स्थापन केली जाणार आहे. महापालिकेतर्फे या वर्षापासून श्रवणात झाडांचा महोत्सव साजरा केला जाईल. त्यात बेलाची झाडे लावून पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्न केला जाईल. बेलाची पाने आरोग्यासाठी लाभदायी असल्याने उत्सवासाठी ही झाडे निवडल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे व उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले.
महापालिकेची वृक्ष व बियाणे बँक महापालिकेतर्फे दर वर्षी एक लाख रोपे उपलब्ध करून दिली जातील. नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांना रोपे उपलब्ध करून दिली जातोल. रोपांची जोपासना करण्याची हमी द्यावी लागेल. एक वर्षानंतर रोपांचे ऑडिट होईल. रोप न जगल्यास पुढील काळात रोप मोफत मिळणार नाही. नागरिकांना त्यांच्या आवडीप्रमाणे रोप दिले यातील, महापालिका शाळेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला आठ दिवसातून एकदा देवराईत श्रमदान करावे लागेल, त्यानुसार विद्यार्थांना गुणांची श्रेणी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महापालिका स्वतःची, वृक्षांची व बियाण्यांची बँक तयार करणार असल्याचे आयुक्त गमे यांनी सांगितले.

