चिंचेचे गाव, तिथल्या झाडांना कोटींचा भाव !

जिल्ह्यातील गिरणारे, कोठुरे चर्चेत : दारातील झाडे विकण्याची लगबग सुरू

अनेक कारणांनी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याची आणखी एक ओळख पुढे येत आहे. जिल्ह्यातील दोन गावे मचिंचेचे गावफम्हणून ओळखले जात असून, या गावातील चिंचेच्या झाडांचे प्रमाण अन् त्यामागील अर्थकारण नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिले आहे. चकीत करणारी बाब म्हणजे चिंचेच्या उत्पादनातून या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने, गावकऱ्यांनाही चिंचेचे झाड उत्पादनाचा उत्तम पर्याय ठरत आहे.

टोमॅटोच्या बाजारपेठेसाठी ओळखले जाणारे गिरणारे अन् निफाडजवळील कोठुरे या गावात जिकडे बघावे तिकडे चिंचेची झाडे नजरेस पडतात. गिरणारे गावात ३५० पेक्षा अधिक, तर कोठुरे गावात ५०० पेक्षा अधिक चिंचेची झाडे आहेत. कधीकाळी हे प्रमाण दुप्पट होते. मात्र अनेकांनी नवीन बांधकामे केल्याने, ही संख्या घटली आहे. खरे तर चिंच हे झाड सदाहरित असल्याने, सावलीसाठी या झाडांचा मोठा फायदा होतो. त्याचबरोबर चिंचेपासून अनेक गुणकारी पदार्थही बनविले जातात. विशेषतः मिठाईबरोबर खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी चिंचेपासून बनविलेली चटणी तसेच चिंचेच्या गोळ्या, चिंचेचा काढा, गर, चिंच पावडर, सॉस, लोणचे, पेय, सिरप आदींसाठी चिंचेचा वापर होत असल्याने चिंचेला मोठी मागणी आहे. अशात व्यापारीवर्ग या दोन्ही गावांमधील चिंचेची झाडेच वर्षभरासाठी खरेदी करतात. झाडांचा घेर तसेच त्याला येणाऱ्या चिंचांच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन त्याची किंमत ठरविली जाते. कमीत कमी ५ ते २० हजारांपर्यंत एका झाडाचा भाव असल्याने सिझनमध्ये या गावांमधील अर्थकारण सुसाट असते.

दरम्यान, सध्या झाडांना पानांपेक्षा चिंचाच अधिक लटकत असल्याने व्यापारीवर्ग गावांमध्ये ठाण मांडून असल्याचेही चित्र आहे. आतापासून पुढील वर्षभर व्यापाऱ्यांकडून झाडे विकत घेतली जाणार आहेत. त्यातून गावकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*