‘देवराई’ निर्मितीमध्ये वन विभागाचा वाटा मोलाचा वृक्ष संमेलनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
बीड : शहराजवळील पालवनच्या डोंगररांगांमधील ‘सह्याद्री देवराई’ च्या कामात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. १४ फेब्रुवारी रोजी पालवन येथे झालेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात चा विभागीय वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. राज्यभरातील व बीडमधील पर्यावरण प्रेमींनी तसेच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी येथे भेट दिल्याने आता वनविभागाची जबाबदारी आणखी वाढली आहे.
जिल्ह्यातील वनक्षेत्र हे ३ टक्क्यांपेक्षा देखील कमी आहे. त्यामुळे येथे सह्याद्री देवराईची संकल्पना सिनेअभिनेते सयाजी शिंदे व लेखक तसेच बीडचे भूमिपुत्र अरविंद जगताप यांना सुचली होती. सर्वांच्या प्रयत्नांतून हे काम उभे राहिले आहे.
याबद्दल वृक्ष संमेलनात सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, सोनाली वनवे, मोरे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान मानचिन्ह देऊन करण्यात आला. या सन्मानामुळे वन विभागांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे हे मात्र नक्की.
तहानभूक विसरून काम
नोकरीपेक्षा निसर्ग प्रेमाची भावना केंद्रित करुन वनरक्षक एस. एस. वनवे यांनी सहकाऱ्यांची मदत, वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून तहानभूक विसरुन काम केले. कधी कधी तर टँकर आहे, पाणी आहे मात्र चालक नसायचा अशा वेळी स्वतः वनरक्षक वनवे यांनी पाटबंधारे विभागात कार्यरत त्यांचे पती फुलचंद बांगर यांना ट्रॅक्टर चालवायला लावून टँकरने झाडांना पाणी देत काळजी घेतली.
सोनाली वनवे यांचे योगदान महत्त्वाचे
- पालवन येथील ‘सह्याद्री देवराई’ येथे वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या वनरक्षक सोनाली वनवे यांनी या उपक्रमात विशेष जबाबदारी पेलली आहे.
- नागरिकांशी संपर्क करून पाण्याचे टँकर झाडांना पाणी देण्यासाठी देण्याचे आवाहन केले. कोणी, किती टँकर दिले याची नोंद ठेवली आहे. सुरुवातीला येथे पाणी नसल्यामुळे कठीण वाटलं होतं मात्र, जसे कामं सुरु झाले तसा उत्साह वाढत गेला.
- येथे येऊन अनेक वेळा जि.प., पं.स.चे नेते, लोकप्रतिनिधी टँकरचे आश्वासन देतात, परंतु परत फिरकत नाहीत. प्रसिद्धीसाठी आश्वासने देण्यापेक्षा आधी झाडांना पाणी मिळावं हीच कळकळीची विनंती त्यांनी केली.

