तुकाई टेकडी बाणेर येथे वसुंधरा अभियान व सह्याद्री देवराईतर्फे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये तसेच टाळ मृदंग वाजवत वृक्ष दिंडी काढण्यात आली होती.
यावेळी वसुंधरा अभियान सदस्य तसेच परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पारंपरिक वेशभूषामध्ये या दिंडीमध्ये उत्स्फूर्त
सहभाग घेतला.
भीमसेनी कापूर या दुर्मिळ औषधी वनस्पतीची निवड करून पालखीमध्ये हे झाड ठेवून दिंडी काढण्यात आली. अभिनेते सयाजी शिंदे यांनी ३९१ व्या शिवजयंती निमित्त गड-किल्ल्यांवर ४०० झाडे लावण्याचे आवाहन केले आहे.
याला प्रतिसाद म्हणून यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. टेकडीवर वसुंधरा सदस्यांनी झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी
अनेक टाक्या बांधल्या आहेत. त्यातील एकोणतिसाव्या ‘सावित्री’ टाकीचे उद्घाटनही सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कदंब या झाडाचे वृक्षारोपण ही त्यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रमास सह्याद्री टीमचे सदस्य अरविंद जगताप, अमोल जाधव, सचिन चंदने तसेच पुणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संदीप काळे उपस्थित होते.

