बार्शीत साकारतेय सह्याद्री वृक्षबँक

वृक्षसंवर्धन समिती राबविणार उपक्रम; शहरातील नागरिकांनीही व्हावे सहभागी

दरवर्षी वाढणारे तापमान, प्रदुषणापासून मुक्ती मिळावी तसेच पशु-पक्ष्यांसह नागरिकांना वृक्षांचा आसरा मिळावा, हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वृक्षसंवर्धन समितीने देशी वाणाची दहा हजार रोपे तयार करून सह्याद्री वृक्ष बँक निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
समितीने शहरातील उपळाई रोड, कुडुवाडी रोड, शिवाजी कॉलेज रोड, अलिपूर रोड, परांडा रोड, वाणी प्लॉट, एकता कॉलनी, गोंधील प्लॉट, आदर्श नगर, भवानी पेठ या ठिकाणी मागील वर्षात २ हजार ८०० वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी २ हजार ४०० वृक्ष आज दिमाखात रस्त्यांच्या दुतर्फा बहरू लागले आहेत. यावर्षी समितीचा ३ हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे. वृक्ष लागवडीसाठी वारंवार वृक्षांची कमतरता भासू लागली अन् यावर समितीमध्ये चर्चा होऊन सहकाऱ्यांच्या मदतीने सह्याद्री वृक्ष बैंक निर्माण करण्याचा निर्णय झाला.

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून बँकेची उभारणी करीत असल्याचे समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. प्रगतशील शेतकरी माधव देशमुख यांनी समितीला वृक्ष बैंक उभारणीसाठी शहरातील जागा काही दिवस विनामूल्य देण्याचे आश्वासन दिले असून देशी वाणाची दहा हजार रोपे तयार करण्यात येणार आहेत. शहरवासियांना विया अथवा रोपे देऊन सहभाग नोंदविता येईल, असे आवाहन समितीने केले आहे. वृक्षसंवर्धन समितीने नुसती वृक्ष लागवडच केली असे नाही तर समितीमधील सुमारे ३५ जण वृक्षांना पाणी देणे, फवारणी करणे, खत टाकणे यासाठी सतर्क असतात अन् त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षांचे संवर्धन झाले असल्याचे नागरिकांमध्ये समाधान आहे.

वृक्षसंवर्धन करणारी टीम संपत देशमुख, सचिन शिंदे, बाबासाहेब बारकूल, राहूल तावरे, अक्षय घोडके, उमेश नलावडे, शशी पोतदार, सुधीर वाघमारे, अमृत खेडकर, डॉ. विजय पवार, डॉ. प्रविण मिरगणे, डॉ. विनायक हागरे, हवालदार दास मस्के, संतोष मस्के, पवन खडसरे, गणेश रावळ, संदिप बेंगळे, राणा देशमुख आदी.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*