निसर्गाचा बिघडत असलेला समतोल हा मानवासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते मातृभूमी प्रतिष्ठान व श्री भगवंत मल्टीस्टेट बार्शीच्या वतीने भगवंत प्रकटोत्सव निमित्त आयोजित भगवंत व्याख्यानमालेत ‘आस्था आणि अनास्था’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव पी.टी. पाटील हे होते. प्रारंभी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, उद्योजक शशिकांत जगदाळे, मार्गदर्शक सनदी अधिकारी अविनाश सोलवट, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, डॉ. आनंद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल आदी उपस्थित होते. सयाजी शिंदे पुढे म्हणाले, शाळेसह सर्वत्र बीज, रोपे व देवराई या तीन सुत्री कार्यक्रम राबवावा लागणार आहे. वृक्षलागवड व झाडे ही जगवलीच पाहीजे. आज सर्वत्र विकासांच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात आहे हे चुकीचे आहे. प्रत्येकाने आपण निसर्गा बरोबर प्रामाणिक आहोत का हे स्वःताला विचारलं पाहीजे.
प्रास्ताविक अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी केले. पोलीस अधिक्षक सातपुते यांनी ही सातारा येथे असताना कशा पद्धतीने देवराई विकसित केली हे सांगितले.
कार्यक्रमास डॉ.बी.वाय. यादव, पो.नि. रामदास शेळके, पी. आर. करंजकर, नागेश अक्कलकोटे, कृष्णराज बारबाले, विकास भालके उपस्थित होते. व्याख्यानासाठी सभागृह खचाखच भरले होते.

