बगळ्यांची शिकार करणाऱ्याची बालसुधारगृहात रवानगी
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलावर बगळ्यांची शिकार करणाऱ्यांचा व्हिडीओ शेअर करत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले होते. त्याची गंभीर दखल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच देवनार पोलिसांनी घेतली आहे. बगळ्यांची शिकार करणारा अल्पवयीन असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वन अधिकारी राकेश भोईर यांनी देवनार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्याशी याविषयी सोमवारी (ता. २०) चर्चा केली. ठाणे खाडीलगत असलेला दाट हिरवळीचा फ्लेमिंगो अभयारण्याचा पट्टा तसेच भाभा अणुसंशोधन केंद्रालगत असलेल्या डोंगरांमुळे बगळ्यांसह विविध पक्ष्यांचा वावर या मानखुर्द-गोवंडी परिसरात असतो. त्यामुळे घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलावर बगळे बसलेले दिसतात. परिसरातील अल्पवयीन बेचकीच्या साह्याने दगड मारून त्यांना इजा पोहोचवतात. त्यामुळे अनेक बगळ्यांचा मृत्यू होतो. ही बाब लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांच्या लक्षात या रस्त्याने प्रवास करताना आली. त्यांनी त्या मुलांना हटकलेदेखील. त्यांनी याविषयीचा व्हिडीओ शेअर करत पोलिसांनी याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले होते.
वनविभागाने पोलिसांशी चर्चा करून कारवाईविषयी निर्णय घेतला. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे नेमकी काय कारवाई करण्यात येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर कारवाई करून आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


