वहागावला लवकरच ‘झाडांचे गाव’ म्हणून ओळखले जाईल : अभिनेते सयाजी शिंदे

कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच कळले आहे. जर ऑक्सिजन प्रत्येकाला हवा असेल, तर प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत. सह्याद्री देवराई वृक्षारोपण या मोहिमेस वहागाव ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला असून, १ हजार झाडांसोबत लोकसहभागातून दोन लाख रुपये निधी उभा केला आहे. त्यामुळे लवकरच वहागावची नवी ओळख झाडांचे गाव असे होईल, असा विश्वास अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
ते वहागाव (ता. कराड) येथे सह्याद्री देवराई वृक्षारोपण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच संग्राम पवार, ग्रामपंचायत सदस्य धनंजय पवार, संतोष कोळी माने, अमित पवार, बाजीराव पवार, दीपक पवार, सुभाष पवार, अनिकेत पवार उपस्थित होते. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सह्याद्री देवराई वृक्षारोपण चळवळ मोठ्या जोमात सुरू आहे. या चळवळीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. आतापर्यंत त्यांनी ३५ देवराई उभ्या केले असून त्यामध्ये तब्बल ४ लाख ५० हजार झाडे लावण्यात आली आहेत.

दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वहागाव येथे वृक्षारोपण टीम कार्यरत करण्यात आली आहे. त्यामध्ये सन २०२२-२३ या वर्षात गावामधील रस्ते, आरोग्य केंद्रामध्ये आयुष बाग, नक्षत्र बाग, जिल्हा परिषद शाळा व ग्राम देवालय परिसरात देशी आंबा, वड, पिंपळ यासारखी देशी झाडे लावण्यासोबत त्यांचे जतन करण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच फळे, फुले तसेच निसर्ग उपयोगी वृक्ष लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे सरपंच संग्राम पवार यांनी सांगितले. या वृक्षारोपणासाठी येणाऱ्या खर्चाकरिता लोकसहभागातून वहागावमधील ग्रामस्थ, युवक, नोकरदार तसेच उद्योजक यांनी दोन लाख एवढी रक्कम उभी केली आहे.

Posted in EnvironmentTags

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*